अद्याप कुठलीही कारवाई का नाही ?
गंगापूर (कैसर जहुरी) : गंगापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या कार्यकाळात ग्राम सेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली, याचा तपशील प्रशासनाने द्यावा, असे निर्मला भालेराव यांनी सांगितले आहे. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की, संबंधित तक्रारी सात ते आठ आठवड्यांत निकाली काढण्यात आल्या का, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. गट विकास अधिकारी वाघचौरे यांनी गंगापूर तालुक्यातील 111 ग्रामपंचायत कार्यालयांना प्रत्यक्ष भेट दिल्या आहेत की नाही, याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे. या संदर्भात विजिट बुकची तपासणी करावी, अशी मागणी भालेराव यांनी केली आहे. याशिवाय, संत साप्ताहिक घोषवाऱ्याची देखील चौकशी होण्याची आवश्यकता त्यांनी नमूद केली आहे.

दरम्यान, 26 डिसेंबर 2024 पासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उपोषणाला 16 दिवस उलटले असले, तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पंचायत समितीतील भ्रष्टाचारामुळे खालून वरपर्यंत “सेटिंग” आणि तडजोडीचा खेळ सुरू असल्याचा आरोप भालेराव यांनी केला आहे. भालेराव यांनी प्रशासनाला 13 जानेवारी 2025 पर्यंत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेच्या समोर लाकडाची शेकुटी पेटवून निवेदनाची होळी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये जर काही अनुचित घडले, तर याला पंचायत समिती कार्यालय गंगापूर आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.