छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : पहाडसिंगपूरा, बुद्ध लेणी, लेणी रोड परिसरात भू-माफिया आणि मुरूम तस्करांचं साम्राज्य दिवसेंदिवस विस्तारत चाललं आहे. बिनधास्त खोदकाम, बिननंबर हायवा वाहने, आणि प्रशासनाच्या गुप्त आशीर्वादाने हा बेकायदेशीर धंदा उघडपणे फोफावतोय. नैसर्गिक संपत्तीवर सरळ लुटमार सुरू असून, ही तस्करी ऐतिहासिक स्थळांच्या सान्निध्यातच निर्भीडपणे केली जात आहे.
या गुन्हेगारी साखळीच्या मुळाशी तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचं संरक्षण असल्याचा ठोस आरोप नागरिकांकडून होत आहे. कोणतेही परवाने नाहीत, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नाही, आणि तरीही खोदकाम, वाहतूक आणि विक्री बिनबोभाट सुरू आहे. ही बाब प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा सवाल निर्माण करते. मुरूम तस्करीमागे “मिळून खाऊ” टाइप यंत्रणा उभी आहे. स्थानिक राजकारण्यांचं छुपं समर्थन, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं पाठीशी राहणं, आणि गुन्हेगारी टोळ्यांचं उघड नेटवर्क — हे त्रिकूट मिळून ही तस्करी सुरू ठेवतंय. सामान्य जनतेच्या मालमत्तेचा आणि पर्यावरणाचा बेधडक विनाश होत असताना संबंधित यंत्रणा मात्र गप्प आहेत. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. “प्रशासन गप्प का?”, “राजकीय पुढारी कुठे आहेत?” – असे प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांची ठाम मागणी आहे की या माफियांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लोक आक्रोशाचा उद्रेक अटळ आहे.