छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने बुधवारी गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल जवळील अनधिकृत खानावळीचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. रिलायन्स मॉल गारखेडा येथे पालिकेच्या जागेवरच हे अतिक्रमण होते.
शेख अखिल यांनी या जागेवर चार वर्षांपूर्वी रसवंतीचा तात्पुरता परवाना घेऊन येथे २५ बाय २५ फूट आकाराचा तात्पुरता लोखंडी पाईप व पत्र्यामध्ये बांधकाम करून खानावळ चालू केली होती. हे अतिक्रमणित बांधकाम गारखेडामार्गे जाणारा मुख्य रस्ता व पुंडलिकनगर रस्त्याच्या कोपऱ्यावर असल्याने स्थानिक नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी त्रास होत होता. तसेच वाहतूक नेहमी

ठप्प होत होती. अतिक्रमण धारकास अनेकदा पालिकने ताकीद दिली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने बुधवारी दुपारी अतिक्रमण विभागातर्फे अतिरिक्त-२ संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सविता सोनवणे, इमारत निरीक्षक मजहर अली, सागर श्रेष्ठ यांच्या अतिक्रमण पथकाने ही कारवाई पूर्ण केली, अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.